Construction Site Accident : रावेतमध्ये भीषण अपघात; दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू, बिल्डरवर गुन्हा दाखल
Construction Site Accident : सुरक्षा जाळी आणि हेल्मेट नसल्याने मजुराचा बळी; रावेत पोलिसांकडून कॉन्ट्रॅक्टरसह संबंधितांचा शोध सुरू.

Construction Site Accident – रावेत येथील एका बांधकाम साईटवर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण रेसिडेन्सी, रावेत येथे घडली.
याबाबत सुमन चंद्रकांत जाधव (वय ३३, सध्या रा. मामुर्डी, हवेली; मूळ रा. काळमंदरगी गुतीतांडा, कर्नाटक) यांनी रविवारी (दि. १५) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर तेजस लखानी (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) आणि बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती चंद्रकांत तेजु जाधव हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वीट बांधकामाचे काम करत असताना तोल गेल्याने खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी जाळी, हेल्मेट किंवा इतर कोणतीही साधने उपलब्ध करून दिली नव्हती.
तसेच सुरक्षेबाबत कोणतीही सूचना दिली नसल्याने या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





