नवी दिल्ली – भूतानच्या सीमेच्या आत चीन दोन मोठ्या गावांची उभारणी करत असल्याच्या संशयाला पुष्टी देणारे काही फोटो उपग्रहांद्वारे उपलब्ध झाले आहेत. एका संकेतस्थळाने उपग्रहांद्वारे मिळवलेले फोटो उपलब्ध केले आहेत. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये 2017 मध्ये जेथे तणाव निर्माण झाला होता, त्या डोकलाम पठारापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर या दोन गावांची उभारणी केली जात आहे. डोकलाममध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना रस्त्यांचे बांधकाम करण्यापासून रोखले होते.
तेंव्हापासून चिनी सैनिकांनी भारतीय ठाण्यांना वगळून रस्त्यांचे बाधकाम पुढे सुरूच ठेवले होते. हे ठिकाण डोकलाम पठारापासून केवळ 9 किलोमीटर अंतरावर आहे. चीनने एका पूर्ण गावाचे बांधकाम केले असल्याचे गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच उपग्रहांच्या फोटोंद्वारे स्पष्ट झाले होते. इंटेल लॅबमधील जिओइंट संशोधक डॅमिअन सायमन यांनी उपग्रहांद्वारे हे गाव शोधून काढले होते. चीन आणि भूतानदरम्यानच्या वादग्रस्त सीमाभागात हे बांधकाम केले जात असल्याचा हा नाकारता न येण्यासारखा पुरावा आहे, असे सायमन यांनी म्हटले आहे.
या फोटोंमध्ये अनेक लहान आकाराच्या झोपड्यांसारखी घरे बांधलेली दिसत आहेत. अनेक घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. बांधकामांसाठी अवजड यंत्रसामुग्रीही या भागात आणली गेल्याचेही स्पष्ट दिसते आहे. हे बांधकाम रस्त्यांच्या जाळ्याला जोडलेलेही दिसते आहे. हे बांधकाम सैनिकांच्या वास्तव्यासाठी आहे का भूतानची भूमी बळकावण्याचा चीनचा हा डाव आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
भूतान आणि चीनदरम्यान गेल्या चार दशकांपासून सीमा मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र त्याचा कोणताही तपशील कधीच उघड झाला नाही. चीनला एक इंच भूमी दिल्याचे भूतानने कधीही जाहीर केलेले नाही.