मोशी येथे होणाऱ्या कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो २०२६ ची घोषणा

Constro International Expo 2026 – पुणे कंस्ट्रक्शन इंजिनीरिंग रिसर्च फौंडेशन (पीसीईआरएफ) आयोजित कॉन्स्ट्रो या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा शुभारंभ सोहळा दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दिमाखदारपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी २५० पेक्षा अधिक कंपनीचे प्रतिनिधी तर ७० पेक्षा अधिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन पुणे कंस्ट्रक्शन इंजिनीरिंग रिसर्च फौंडेशनचे विशेष निमंत्रित ज्येष्ठ वास्तुविशारद बडवे यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून ज्येष्ठ वास्तुविशारद व आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव राजे उपस्थित होते. यावेळी कॉन्स्ट्रो २०२६ मोबाईल ॲपचे देखील उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पीसीईआरएफ संस्थेविषयी माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कोठारी यांनी दिली. तर कॉन्स्ट्रो २०२६ चे अध्यक्ष जयदीप राजे यांनी या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती दिली. आभार प्रदर्शन संस्थेचे माननीय सचिव शिरीष केंभावी यांनी केले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हे या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे संकल्पना भागीदार आहेत व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे या प्रदर्शनाचे सहयोगी भागीदार आहेत. या वर्षीचे प्रदर्शन हे मालिकेतील २० वे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन ०८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत पीएमआरडीएच्या मोशी येथील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (पीआयईसीसी) येथे होणार आहे. यामध्ये यंत्रसामग्री, बांधकामाच्या नवीन पद्धती, साहित्य आणि तंत्रज्ञानाशी निगडित ४०० पेक्षा अधिक स्टॉलस असणार आहेत, ५० हजारांहून जास्त लोक दरवर्षी या प्रदर्शनाला भेट देतात. या प्रदर्शनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या या प्रदर्शनात औद्योगिक सुरक्षा शिखर परिषद हा नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे.





