पुणे | काँग्रेसकडूनही संविधान सन्मान रथ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रिपब्लिकन , दलित व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील सुमारे १०० वस्त्यांमधून संविधान सन्मान रथाद्वारे प्रचार करण्यात आला. २५ ठिकाणी कॉर्नर बैठका, प्रचार पत्रकांचे वाटप, विविध बैठकांचे नियोजन , मेळावे याद्वारे हा प्रचार करण्यात आला. त्या अंतर्गत संविधान पे चर्चा हा कार्यक्रम राबविला जात असून त्यास प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या समवेत आज काँग्रेस भवन येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गेल्या महिन्याभरापासून धंगेकर यांच्या प्रचारासंदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीकडून करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
संविधानाच्या मुद्द्यावर आंबेडकरी चळवळीमध्ये असंतोष असून भाजप विरोधी लाट पसरलेली असून भाजपाच्या पराभवासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अपेक्षे शिवाय आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रचारांमध्ये मोठं योगदान देत असल्याने काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे सचिव गौतम आरकडे, सुजित यादव , प्रियंकाताई रणपिसे , शैलेंद्र मोरे , अशोक जगताप , विनोद रणपिसे , सुंगरताई ओव्हाळ , सोनियाताई ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.





