Nagar | मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाही- आ.आशुतोष काळे

कोपरगाव (प्रतिनिधी): – मतदारसंघातील जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करून मतदार संघाचे रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत प्रश्न बहुतांशी सोडविले आहेत परंतु अजूनही काही प्रश्न सोडवायचे आहेत.
मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही असेच राहतील, आपले आशीर्वाद असेच पाठीशी ठेवा. मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाही,अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आ.आशुतोष काळे यांच्याहस्ते सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ब्राम्हणगाव-टाकळी-कोपरगाव-कोकमठाण-सडे-शिंगवे या रस्त्याच्या ४ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन, २.५० कोटी निधीतून पुणतांबा रोड ते कारवाडीमध्ये सुधारणा करणे व तीन चारी येथे ११ के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी लाईन स्थलांतरित करणे आदी कामाचा शुभारंभ आ. काळे यांच्याहस्ते करण्यात आला तसेच दिव्यागांना निधीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
आ. काळे म्हणाले की, हभप.सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी येणाऱ्या लाखो भाविकांना रस्त्याची अडचण जाणवू नये,
यासाठी कोकमठाण गावातील बहुतांश रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन रस्ते चकाचक केले. पुन्हा चार कोटीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करीत आहोत. कोकमठाण व परिसराचा विजेचा प्रश्न सोडविला.
५५ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला असून, त्याला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कोकमठाणच नाही तर मतदारसंघातील प्रत्येक गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देवू नका, आपल्याला अजून विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे, असे आ. काळे यांनी सांगितले.





