लग्नापूर्वीच पतीच्या हत्येचा कट; सुपारी देणारी महिला फरार, पाच जणांना अटक

पुणे – होणारा नवरा पसंत नसल्याच्या कारणावरून एका महिलेने त्याला जिवे मारण्यासाठी १.५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत, खामगाव फाट्याजवळ सोलापूर-पुणे हायवेवर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता हा हल्ला घडला. या प्रकरणात यवत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधार मयुरी सुनिल दांगडे ही अद्याप फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध तीव्र केला आहे.
फिर्यादी सागर जयसिंग कदम (वय २८, व्यवसाय हॉटेल कुक, रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी ७:५० च्या सुमारास साई मिसळ हॉटेलजवळ पांढऱ्या वेरणा कारमधून (पाठीमागील नंबर प्लेटवर ‘महाकाल’ लिहिलेले) आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. “जर तू मयुरीशी लग्न केले तर तुला दाखवतो,” अशी धमकी देत हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत सागर गंभीर जखमी झाले. त्यांनी १ मार्च २०२५ रोजी यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, ज्यानंतर गुन्हा क्रमांक २१७/२०२५ अंतर्गत भादंवि कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला गेला.
तपासादरम्यान, २८ मार्च २०२५ रोजी संशयित आदित्य शंकर दांगडे (वय १९, रा. गुघलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, मयुरी सुनिल दांगडे आणि संदीप दादा गावडे (वय ४०, रा. गुघलवडगाव) यांच्या सांगण्यावरून हा हल्ला घडवण्यात आला. मयुरीला सागर पसंत नव्हता, त्यामुळे तिने १.५ लाखांची सुपारी देऊन सागरला मारण्याचा कट रचला. या कटात आदित्यासह शिवाजी रामदास जरे (वय ३२, रा. पिंपळगाव पिसा), इंद्रभान सखाराम कोळपे (वय ३७, रा. पिंपळगाव पिसा), आणि सुरज दिगंबर जाधव (वय ३६, रा. काष्टी) यांचा समावेश होता.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आदित्य आणि संदीप यांना २८ मार्च रोजी, शिवाजी याला २९ मार्च रोजी, तर इंद्रभान आणि सुरज यांना त्याच दिवशी रात्री अटक केली. हल्ल्यात वापरलेली कार आणि लाकडी दांडके जप्त करण्यात आले. तपासात हल्ल्याचा उद्देश सागरला जिवे मारणे हा असल्याचे स्पष्ट झाल्याने भादंवि कलम १०९, ६१(२), आणि १२६(२) वाढवण्यात आले.
या कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख, सहायक निरीक्षक महेश माने, प्रविण संपांगे, उपनिरीक्षक किशोर वागज, मारोती मतलवाड, पोलीस कर्मचारी कर्चे, गायकवाड, देवकर, काळे, चांदणे, यादव, कापरे, बाराते, करूड, भानवसे यांनी सहभाग घेतला. सध्या फरार असलेल्या मयुरी दांगडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली असून, तपास सहायक निरीक्षक महेश माने करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.





