पिंपरी | युवकांकडून गड, किल्ले संवर्धन, मतदार जनजागृती

लोणावळा (वार्ताहर) – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गड किल्ले संवर्धन आणि मतदार जनजागृतीचा संदेश देत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या दोन तरुणांनी एकच दिवसात मावळ, मुळशी भागातील पाच गिरिदुर्ग सर केले.
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे शुभम मानकामे, पवन सावंत या दोन तरुणांनी ही मोहीम केली आहे. अवघ्या 12 तासात लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग आणि कोराईगड हे पाच डोंगरी किल्ले सर करणाऱ्या या तरुणांनी अनोख्या पद्धतीने दोन महत्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.
यातील पहिला संदेश म्हणजे गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राची ओळख सांगणारा अनमोल ठेवा आणि अभिमान आहे. या गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, त्यांची निगा राखली जावी आणि दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे सध्या निवडणूकीचा कालावधी असल्याने मतदात्यांनी त्यांचे मत वाया जाऊ न देता आपला मतदानाचा हक्क नक्की बजवावा.
महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी हे पाचही किल्ले सर केले. या वेळी राज्य सरकार व पुरातत्व विभागाच्या माध्यमातून किल्ल्याची डागडुजी, पायरी बांधकाम, तटबंदी दुरूस्ती ही काम सुरू असल्याचे बघून मनापासून आनंद झाला असल्याचे शुभम मानकामे याने सांगितले. सरकार आणि पुरातत्व विभाग त्यांचे काम करीत आहेच. पण नागरिकांनी देखील या प्रयत्नांना साथ देऊन किमान गड किल्ल्यावर स्वच्छता ठेवावी. तसेच या ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण करू नये असे आवाहन केले.





