पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन क्षेत्रात कमी करता आता 1 हजार 285 हेक्टर म्हणजेच सुमारे 3 हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे स्विकारण्यास कालपासून (दि.25) सुरूवात झाली. विमानतळासाठी भूसंपादनासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वत:हून पुढे येत असल्याचे चित्र आहे. भूसंपादनासाठी संमती देण्याच्या पहिल्याच दिवशी 760 शेतकऱ्यांनी सुमारे 1 हजार 70 एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसुचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी सोमवारपासून पासून समंत्रिपत्र स्वीकारण्यात जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात करण्यात आली. संमतिपत्र सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भुखंडासह चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, आज पहिल्या दिवशी सातही गावातील सुमारे ७६० जागा मालकांनी संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. सुमारे १ हजार ७० एकर जागेची ही संमतिपत्रे आहेत. भूसंपादन करण्यात येणाऱ्या सात गावांपैकी पारगाव मधून सर्वाधिक म्हणजे ३२० जागा मालकांनी संमतिपत्र दिली आहेत, त्यांचा परतावा निश्चित झाला आहे. दबाब आणणाऱ्यांवर कारवाई करणार… जे जमीन मालक आहेत, त्यांना त्यांच्या जमिनीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. विमानतळासाठी ज्या जागा मालकांनी संमतिपत्रे सादर करावयाची आहेत. परंतु, ती करू नयेत, यासाठी संबंधित शेतकऱ्यांवर कोणी दबाव आणत असेल, तर शेतकऱ्यांनी घाबरू नये, असा दिलासा देत जिल्हाधिकारी डुडी यांनी दबाब आणणाऱ्यांवर प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.