नवी दिल्ली – श्रीमंतांना 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घालणारा आणि बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला सुकेश चंद्रशेखर याने तिहार जेल प्रशासनाची झोप उडवली आहे. तुरूंगात आपल्याला आपल्या पत्नीसोबत राहु दिले जावे अशी त्याची मागणी असून त्याकरता त्याने उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. त्याच्या या मागणीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जेलमध्ये कैद्यांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पत्नीसोबत राहण्याची अनुमती दिली जाते. सुकेशची पत्नी लीना मारियाही गुह्यात त्याची भागिदार असल्यामुळे तीही तुरूंगात आहे. इतर कैद्यांना दिली जाते तशी सवलत सुकेशला देण्यात आली आहे. मात्र त्याला आणखी काळ पत्नीसोबत राहायचे असल्याने त्याने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 23 एप्रिल ते 2 मे आणि पुन्हा 4 मे ते 12 मे असे दोनदा त्याने उपोषण केले. 19 दिवस त्याने उपोषण केले. त्याची प्रकृती बिघडू नये म्हणून त्याला लिक्विड ग्लुकोज देण्यात आले. त्याने अन्न सोडले असून माघार घ्यायला तो तयार नाही. त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे.
वयाच्या 17 व्या वर्षांपासून गुन्हेगारी जगतात प्रवेश केलेल्या सुकेशने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त श्रीमंतांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या श्रीमंताना तो हेरायचा. त्यांचा अभ्यास करायचा अन नंतर अधिकारी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधायचा. उत्तम संभाषण कौशल्य असल्यामुळे समोरच्या प्रभावित करून तो मदत देउ करायचा आणि आपले इप्सित साधायचा अशी त्याची कार्यपध्दती होती.