Congress On ceasefire: युद्धविरामाच्या अटी काय होत्या? काँग्रेसने पंतप्रधान मोदींना कोणते प्रश्न विचारले ते जाणून घ्या

Congress On ceasefire: काँग्रेसने बुधवारी आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर युद्धविराम आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत प्रश्नांचा भडिमार केला. काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी युद्धविरामाची पहिली घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली, यावर गंभीर आक्षेप घेतले. त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकीय ब्रँडिंग करत आहेत.
काँग्रेसने म्हटले की, युद्धविरामाची घोषणा अमेरिकेतून होणे आणि काश्मीर मुद्द्यावर तिथे चर्चा होण्याचा प्रयत्न गंभीर आहे. “काश्मीरचा मुद्दा फक्त भारतीय संसदेतच चर्चिला जावा, पण पंतप्रधान यावर मौन बाळगत आहेत,” असे नेत्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी पाकिस्तानविरुद्ध सैन्य कारवाई थांबवण्याच्या निर्णयावर आणि काश्मीरबाबत वक्तव्ये केल्याने देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न :
१. युद्धविरामाची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमार्फत का झाली?
२. युद्धविरामाच्या अटी काय होत्या?
३. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी भारताला केव्हा सुपूर्द केले जातील? ही अट युद्धविरामात होती का?
४. पाकिस्तानातील इतर दहशतवादी, ज्यांना जग ओळखते, भारताला केव्हा सुपूर्द केले जातील?
काँग्रेसने ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकीयकरण होत असल्याचा आरोप केला. “फक्त रालोआ शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून हे ऑपरेशन पक्षाचे ब्रँड बनवले जात आहे,” असे त्यांनी म्हटले. बैठकीत पहलगाम हल्ल्यातील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या त्रुटींवरही चिंता व्यक्त झाली. काँग्रेसने सर्वपक्षीय बैठक आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.





