न्याय यात्रेच्या पहिल्या दिवशीच काँग्रेसला धक्का ! काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणतात,”ही हेडलाईन मॅनेजमेंट..”

नवी दिल्ली – भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने हा मोदींच्या स्क्रिप्टचा भाग असल्याचे म्हंटले आहे.
काँग्रेसने रविवारी आरोप केला की, त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवली होती. ही घटना म्हणजे केवळ मोदींच्या हेडलाईन मॅनजमेंटचा भाग आहे असाही कॉंग्रेसने म्हंटल आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, देवरा यांनी शुक्रवारी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि ठाकरे गट दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर दावा करत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून राहुल गांधींशी बोलू इच्छित असल्याची विनंती केली. मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली देवरा हे दोघेही दक्षिण मुंबईतून खासदार होते.
मात्र देवरा यांचा हा केवळ एक दिखावा होता. त्यांनी कॉंग्रेस मधून जाण्याचा निर्णय आधीच घेतला होता, त्यांच्या जाण्याची वेळ मात्र पंतप्रधानांनी ठरवली असा आरोप जयराम रमेश यांनी केला. आजच राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू होत आहे, त्यामुळे त्यावर कुरघोडी करण्यासाठीच ही हेडलाईन मॅनजमेंट केली गेली असेही रमेश यांनी म्हटले आहे.





