काँग्रेस खासदाराच्या वाहनाला भीषण अपघात, उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना घडली दुर्घटना

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत मतदान करून भंडाऱ्याकडे परतत असताना काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज, (11 सप्टेंबर) पहाटे नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. पडोळे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, खासदारांसह त्यांचे स्वीय सहायक आणि सहकारी सुखरूप आहेत.
कसा घडला अपघात?
8 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी देशभरातील खासदार दिल्लीत दाखल झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 48 खासदारांचाही समावेश होता. निवडणुकीत भाजप-एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन विजयी झाले.
मतदानानंतर डॉ. पडोळे दिल्लीहून विमानाने मुंबईत पोहोचले आणि कार्यालयीन कामे आटोपून आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे परतत होते. पहाटे सहाच्या सुमारास नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि जोरदार धडक झाली. हा अपघात भीषण असला तरी जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती कळताच डॉ. पडोळे यांच्या समर्थकांनी आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातील नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुदैवाने, खासदार आणि त्यांचे सहकारी सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. डॉ. पडोळे यांच्या किरकोळ जखमांवर तातडीने उपचार देण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन रस्त्याच्या कडेला हलवले असून, पुढील तपास सुरू आहे.





