Maharashtra Election : ‘मतदान झाल्यावर कुणाला कसं बारीक करायचं, मी ठरवलंय’ काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी दिली धमकी

वरोरा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रचाराच्या तोफादेखील थंडावल्या आहेत. एकीकडे मतदानाची तयारी सुरु असताना दुसरीकडे उमेदवारांवर हल्ले, नेत्यांकडून पैसे वाटप या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. यादरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्या मतदारांना धमकी देताना दिसत आहेत.
काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर?
‘“आज काही लोक अपक्षांच्या पाठीमागे गाड्या घेऊन फिरत आहे. त्यांना मी सांगितलं. आता तुम्ही अपक्षाच्या पाठिशी राहाल तर शेवटी समाजाची खासदार म्हणून 5 वर्ष परत आहे. आज जे जे लोक माझ्या विरोधात बोलत आहे. त्यांना मी काही बोलणार नाही. परत ५ वर्ष मी खासदार असणार आहे. तेव्हा प्रत्येकाचा लेखाजोखा घेईल असे प्रतिभा धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेमध्ये म्हणाल्या.
तसेच या विधानसभेत कोणी विरोध केला आणि कुणी पाठिंबा दिला. हे शोधून काढायला फार वेळ लागणार नाही. २० तारखेचं मतदान झालं, २१ तारखेला गावनिहाय लिस्ट माझ्याकडे येईल, कुणाला कसं ठेवायचं, कुणाला कसं बारीक करायचं, याचा सगळा विचार मी केला आहे’ असा दमच प्रतिभा धानोरकर यांनी मतदारांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.





