पुणे – महाविकास आघाडीपैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली, त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांचे मंत्री इथे महाराष्ट्रात येऊन थापा मारून गेले, अशी टीका भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथील उदाहरणे देऊन जावडेकर म्हणाले, की राहुल गांधी यांनी लेख लिहून देशातील उद्योग जगतामध्ये ठराविक उद्योगांनाच वाव मिळतो, असे म्हटले. जी सर्वथा धूळफेक आहे. मोदी सरकारच्या काळात उद्योगधंद्यांचं लोकशाहीकरण झाले असून, सर्वांना उद्योग करायला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यात येईल,आरक्षण संपवण्यात येईल, असा खोटा प्रचार केला होता. मात्र, आता जनतेला त्यातला खोटेपणा लक्षात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की या देशामध्ये घटना संपवण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे, असे जावडेकर म्हणाले.
१९७५ मध्ये आणीबाणी घोषित करून, बोलण्याचे स्वातंत्र्य, संघटनेचे स्वातंत्र्य, विरोधाचे स्वातंत्र्य,राजकीय पक्ष चालवण्याचे स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली सर्व स्वातंत्र्ये संपुष्टात आणली होती. हे केवळ पंतप्रधानपदाची खुर्ची वाचवण्यासाठी केले होते. पुढे घटनेचा आढावा घेण्यासाठी स्वर्णसिंग कमिटी नेमण्यात आली.
या कमिटीने एक महिन्यामध्ये विचार विनिमय पूर्ण करून, अशी दुरुस्ती सुचवली की, ज्यामुळे न्यायालयाचे अधिकारही संपुष्टात आले आणि पंतप्रधानाविरुद्धचा खटला चालवण्याचा अधिकारच त्यांचा काढून घेण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.
अमेरिकेत भारतामधील आरक्षण रद्द करण्याचे विचार राहुल गांधींनी व्यक्त केले आणि नाना पटोले यांनी ते योग्य ठरवले, हेच महाविकास आघाडीचे स्वरूप आहे. मतदारांना याची जाणीव आहे आणि मतदार या वेळेला महायुतीला प्रचंड मोठा विजय देतील, असा मला विश्वास आहे, असे जावडेकर म्हणाले.