राज्यात महिला बचतगटांचे सर्वाधिक जाळे ! कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांचे मत

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -महिला सबलीकरणाचे देशात सर्वत्र काम सुरु आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या महिला बचटगटांची चळवळ देशभर सुरु आहे. देशात महिला बचतगट महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ही कौतुकाची बाब आहे, असे मत माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केले. महिलांना सक्षम करण्यासाठी बचतगटांचे कार्य अतुलनीय असून या कार्याला हातभार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुणे शहर, जिल्हा कॉंग्रेस कमिटी, प्रियदर्शनी वुमेन्स फोरम व पायल तिवारी बिटीया फाऊंडेशनच्यावतीने कॉंग्रेसभवन प्रांगणात भरविण्यात आलेल्या गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन निरुपम यांच्या हस्ते झाले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, जत्रा महोत्सवाच्या आयोजक व महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, माजी आमदार दीप्ती चवधरी, अभिनेत्री प्रतिक्षा जाधव, आरती शिंदे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सुजात शेट्टी, रफीक शेख उपस्थित होते.
“बचतगटांना व्यासपीठ तयार करुन देणे कष्टाचे काम आहे. 13 वर्षे अविरतपणे हा उपक्रम सुरू असून महिलांना जोडण्याचे काम सुरू आहे,’ असे मत अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या उपक्रमात यंदा
70 हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांसह वाती ते मूर्ती सर्वप्रकारचे साहित्य एकाच छताखाली मिळणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गौरी गणपती साहित्य जत्रा महोत्सव खुला असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार सुवर्णा माने यांनी मानले.





