दिल्लीतील १९८४ च्या हत्या प्रकरणात कॉंग्रेस नेते सज्जन कुमार दोषी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगली प्रकरणात दोन जणांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. सरस्वती विहार परिसरात दोन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
१ नोव्हेंबर १९८४ रोजी सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली होती. वकील अनिल शर्मा यांनी असा युक्तिवाद केला होता की सज्जन कुमार यांचे नाव या प्रकरणात सुरूवातीपासून नव्हते. परदेशी भूमीचा कायदा येथे लागू होत नाही आणि साक्षीदाराने १६ वर्षांनंतर सज्जन कुमार यांचे नाव घेतले आहे.
तसेच सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबतची आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात, दंगलग्रस्तांच्या वतीने वरिष्ठ वकील एचएस फूलका न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांनी असा युक्तिवाद केला की पोलिसांनी शीख दंगल प्रकरणांच्या तपासात छेडछाड केली आहे.
त्यांनी म्हटले होते की पोलिसांचा तपास मंदावला होता आणि आरोपींना वाचवण्याचे प्रयत्नही केले जात होते. याशिवाय, त्यांनी न्यायालयात असा युक्तिवादही केला होता की दंगलीच्या काळात परिस्थिती असाधारण होती. म्हणून, या बाबी या संदर्भातून हाताळल्या पाहिजेत.


