‘भाजप आणि आरएसएसने सुनियोजित कट करून…’, काँग्रेसच्या अधिवेशनात मल्लिकार्जून खर्गेंची जोरदार टीका

अहमदाबाद- सरदार पटेल साहेब आमच्या हृदयात राहतात, आमच्या विचारांमध्ये राहतात. आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत आहोत. हा विचार लक्षात घेऊन आम्ही अहमदाबादमधील सरदार पटेल संग्रहालयात ही बैठक आयोजित केली आहे. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) सुनियोजित कट करून पक्षाचा देशाच्या राष्ट्रीय नायकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली.
ते काँग्रेसच्या येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात आज सुरू झालेल्या ८४ व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बोलत होते. काँग्रेसचे हे अधिवेशन दोन दिवस (८ आणि ९ एप्रिल) चालेल. काँग्रेसने तब्बल ६४ वर्षांनंतर गुजरातमध्ये या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. यापूर्वी १९६१ मध्ये भावनगर येथे अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचा हे पहिलेच अधिवेशन होते.
या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी सकाळी १०.३० वाजता अहमदाबादला पोहोचले. एअर इंडियाच्या लंडन विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने दोन्ही नेते अहमदाबादला अर्धा तास उशिरा आले.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात काँग्रेस अधिवेशनाची सुरुवात काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीने झाली. त्यात काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांसह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सरदार पटेल यांनी स्वीकारलेल्या सामाजिक न्यायाच्या मार्गावर चालण्याची शपथ देखील घेतली.
त्यांनी आज दिवसभर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्लूसी) बैठकीला हजेरी लावली. यानंतर संध्याकाळी साबरमती आश्रमालाही त्यांनी भेट दिली. याप्रसंगी काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्याच वेळी, आज ८० काँग्रेस नेते दोन चार्टर्ड विमानांनी अहमदाबादला पोहोचले आहेत. ज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अन्य नेत्यांचा समावेश होता.
९ एप्रिल रोजी मुख्य आधिवेशन
मुख्य अधिवेशन ९ एप्रिल रोजी होणार आहे, ज्यामध्ये देशभरातील १,७०० हून अधिक काँग्रेस समितीचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा कार्यक्रम साबरमती रिव्हर फ्रंट येथे होईल. येथे एक व्हीव्हीआयपी घुमट बांधण्यात आला आहे. न्यायाचा मार्ग: संकल्प, समर्पण आणि संघर्ष, असा अधिवेशनाचा विषय आहे.
संघटनात्मक फेरबदल होणार
काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक फेरबदल होणार आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी येथे बोलताना सांगितले. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना वेणुगोपाल म्हणाले, काँग्रेसने हे वर्ष पक्ष संघटनेच्या संपूर्ण पुनर्रचनेसाठी समर्पित केले आहे आणि बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील असतील. आमचे सरचिटणीस आणि प्रभारी यावर काम करत आहेत, असेही ते म्हणाले. तसेच, उपस्थित सर्वांनी आज सरदार पटेलांच्या न्यायाच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.




