Dilip Mane : भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा सभापती! सोलापुरात राजकीय प्रयोग…

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते व माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेस नेत्याची निवड करण्यात आली आहे. उपसभापतीपदी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती पदाची निवड दोन वर्षांसाठी राहणार आहे. दोन वर्षानंतर नव्या संचालकांना संधी मिळणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील विजयानंतर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार व काँग्रेस नेते दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत सभापती आणि उपसभापती कोण होणार, यावर चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सभापती ठरविणार, असे सांगण्यात आले होते. रविवारी दिलीप माने आणि सुनील कळके यांची नावे जाहीर करण्यात आली. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलीप माने यांचे नाव सभापती पदासाठी, तर उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचे नाव जाहीर केले. दोघांनीच सभापतीपद आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले होते.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन पॅनेल बनविले होते. विरोधात भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने १८ पैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवर वर्चस्व मिळविले होते. फडणवीसांच्या आमदाराने काँग्रेस नेत्यांना सोबत घेत भाजपच्या दिग्गज आमदारांच्या पॅनलचा पराभव केला होता.





