‘मतचोरी’विरोधात कॉंग्रेसची जनमोहीम, वेब पोर्टल लॉंच; जनतेला सहभागी होण्याचे आवाहन

नवी दिल्ली –निवडणुकांमधील कथित अनियमितता आणि मतचोरी विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारणाऱ्या कॉंग्रेसने आता व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पक्षाने votechori.in/ecdemand या नावाने एक वेब पोर्टल सुरू केले आहे. संबंधित पोर्टलवर नोंदणी करून निवडणूक आयोगाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हा, असे साकडे कॉंग्रेसने जनतेला घातले आहे.
देशातील विविध निवडणुकांत अनियमिततांचे गंभीर सत्र सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावरून निवडणूक आयोगाला घेरण्यात कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. त्या पक्षाने आता थेट जनतेला साद घालून कथित अनियमिततांविरोधातील लढा तीव्र बनवण्याचा संकल्प केला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूक चालू वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे.
त्याशिवाय, पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आदी राज्यांत विधानसभा निवडणुका होतील. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसने कथित मतचोरीविरोधात एल्गार पुकारत वेब पोर्टल लॉंच केले आहे. त्या माध्यमातून मतचोरीची माहिती देण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने प्रमाणपत्र जारी होईल. मी मतचोरीविरोधात आहे, असा त्या प्रमाणपत्राचा आशय असेल.





