विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला पहिला धक्का?

Congress in Delhi – आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला कडवी झुंज देण्यासाठी 26 विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. या पक्षांनी त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असे नाव दिले आहे. हे सर्व विरोधी पक्ष एकजुटीतून भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा दावा करत आहेत. मात्र विरोधकांच्या या नव्या आघाडीसाठी जागावाटप हा मोठा स्पीडब्रेकर ठरू शकतो. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. अशातच काँग्रेसतर्फे राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आल्याने आम आदमी पक्षामध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त आहे.
दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी, त्यांचा पक्ष दिल्लीतील सर्व 7 जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले असून बैठकीत आम आदमी पक्ष किंवा आघाडीची चर्चा झाली नाही. असं स्प्ष्टपणे सांगितलं.
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप असे तीन प्रमुख पक्ष आहेत. अशातच विरोधकांच्या नव्या आघाडीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र आले आहेत. अशात राजधानी दिल्लीतील सर्व जागांवर काँग्रेस नेते करत असलेला दावा I.N.D.I.A. आघाडीसाठी घोकादायक ठरू शकतो.
आम आदमी पार्टीची भूमिका
दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीबाबत आम आदमी पक्षातर्फे देखील अधिकृत वक्तव्य करण्यात आले आहे. दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी याबाबत बोलताना, ‘इंडिया’चे सर्व पक्ष जेव्हा बसून जागावाटपावर चर्चा करतील, तेव्हा सर्व पक्षांचे राष्ट्रीय नेतृत्व समोरासमोर बसून चर्चा करतील, त्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवणार हे कळेल. कोणाला कोणत्या जागा मिळतात याबाबत आताच बोलणं घाईच ठरेल.
विरोधकांच्या आघाडीवर भाजपचे पुन्हा प्रश्नचिन्ह
दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या आघाडीवर भाजपने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत सोशल मीडियावर, “काँग्रेस दिल्लीत लोकसभेच्या सर्व 7 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. आम आदमी पक्षासाठी हा धक्का आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात काँग्रेस यूपीमध्ये सपा, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, बिहारमध्ये आरजेडी-जेडीयूसोबत असेच काही करत असल्याचे पाहायला मिळू शकते. ही युती 2024 पर्यंत टिकणार नाही.” असा दावा केला आहे.





