हरियाणात कॉंग्रेसने दिली जातगणनेची हमी

चंदिगढ : विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या हरियाणात कॉंग्रेसने जातगणना करण्याची हमी दिली आहे. तसेच, जातगणना रोखण्याचे स्वप्न पाहणे थांबवावे असा इशाराही सत्तारूढ भाजपला दिला आहे. मागील काही काळापासून कॉंग्रेसने जातगणनेची मागणी आग्रहीपणे लावून धरली आहे.
अशात एका संस्थेने सर्वेक्षणाचा हवाला देत देशातील ७४ टक्के जनतेला जातगणना हवी असल्याचा दावा केला आहे. त्याचा संदर्भ देऊन हरियाणातील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या आणि खासदार कुमारी सेलजा यांनी एक निवेदन जारी केले. कॉंग्रेस हरियाणात सत्तेवर आल्यास राज्यात जातगणना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी भाजप दलितविरोधी आणि आरक्षणविरोधी असल्याचे टीकास्त्रही सोडले.
कॉंग्रेस आणि विशेषत: त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने जातगणनेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यांनी रविवारीही त्यासंदर्भात सोशल मीडियावरून भूमिका मांडताना ताज्या सर्वेक्षणाचा आधार घेतला. कुठलीच शक्ती देशव्यापी जातगणना रोखू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. त्यापाठोपाठ सेलजा यांनी निवेदन जारी केले. त्यामुळे हरियाणातील प्रचारावेळी कॉंग्रेस जातगणनेचा मुद्दा लावून धरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.





