पुणे | काँग्रेसचा आजपासून “गांधीगिरी आंदोलन’ सप्ताह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पेट्रोल-डीझेल कंपन्या आणि सरकारकडून करांच्या माध्यमातून होणारी जनतेची लूट, दरवाढ याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात दि. ३ ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान गांधीगिरी आंदोलन सप्ताह पाळण्यात येणार आहे. ही माहिती माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे बुधवारी दिली.
गांधीगिरी आंदोलनाचा प्रारंभ दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मी रोडवरील कुलकर्णी पेट्रोल पंप येथून होईल. त्यानंतर दरदिवशी विधानसभेच्या एकेक मतदारसंघातील मध्यवर्ती पेट्रोल पंपांवर आंदोलन केले जाईल.
येथे येणाऱ्या ग्राहकांना काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोल, डीझेलचे दरपत्रक आणि गुलाबाचे फूल भेट देतील, असे जोशी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून ३२.५ टक्क्यांनी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तरीही भारतातील जनतेला त्याचा लाभ मिळालेला नाही.
यात तेल कंपन्या आणि मोदी सरकार यांनी नफेखोरी केली. लिटरमागे सरसकट २० ते २५ रूपये किंमत कमी होणे अपेक्षित होते. त्यामुळे या दरवाढीच्या आणि जनतेच्या लुटीच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.





