काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजनेला यश येईल; कर्नाटकचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांना विश्वास

पुणे – काँग्रेसचे शासन असलेल्या कर्नाटकमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ५ गॅरंटी योजना यशस्वीपणे सुरू आहे. काँग्रेस केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कोणतीही योजना आणत नाही. दीर्घकालीन विचार करून महाराष्ट्रात काँग्रेसने कर्नाटकच्या धर्तीवर ५ गॅरंटी योजना आणली असून, ती राज्यात यशस्वी होईल, असे कर्नाटक सरकारचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले.
के. जे. जॉर्ज यांनी मंगळवारी काँग्रेस भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
भाजपच केवळ विकास करू शकते, हा गैरसमज आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा समज खोडून टाकला आहे. काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या जनतेला गृह लक्ष्मी, शक्ती, गृह ज्योती, अन्न भाग्य आणि युवा निधी या पाच योजनांची गॅरंटी दिली होती. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. या योजनांमुळे राज्य दिवाळखोरीत निघेल, अशी भविष्यवाणी भाजप आणि विरोधी पक्षांनी केली होती.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने राज्याच्या आर्थिक विकासाद्वारे त्यांना प्रत्युत्तरही दिले, असे के. जे. जॉर्ज यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना किमान अन्नधान्य न मिळणे, किमान गरजा पूर्ण न होणे हे देखील विकास न झाल्याचे लक्षण असल्याचेही के. जे. जॉर्ज यांनी याप्रसंगी सांगितले.





