पुणे – कसबा विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलवून, कॉंग्रेसची १८ महिन्यांची कारकीर्द भाजपने संपुष्टात आणली आणि मतदार संघ पुन्हा हस्तगत केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव करून कॉंग्रेसने कसबा विधानसभा मतदार संघाचा किल्ला स्वत:च्या ताब्यात घेतला होता. तो रासनेंनी परत हिसकावून घेतला आणि तेथे विजयाची मुहूर्तमेढ रोवली. भाजपच्या हातून कसबा गेल्याची सल अनेक “भाजपेयीं’मध्ये होतीच. यावेळी झालेल्या अंतर्गत राजकारणामुळे कसबा हातून गेला, परंतु यावेळी सगळ्याच गोष्टी विसरून एकजूट दाखवत आणि “एक है, तो सेफ है’ या नाऱ्याला प्रतिसाद देत रासने यांच्या गळ्यात कसबेकरांनी विजयाची माळ टाकली. या मतदार संघात चौरंगी लढत होती. त्यामुळे बंडखोरीचा फायदा कोणाला होणार, कोण किती मते खाणार याविषयी अनेक तर्क लढवले जात होते. यात रासने यांना ९० हजार ४६ मते मिळाली तर धंगेकर यांना ७० हजार ६२३ मते मिळाली. मनसेच्या गणेश भोकरे यांना ४ हजार ८९४ मते मिळाली; तर कॉंग्रेसमधून बंडखोरी केलेल्या कमल व्यवहारे यांना ५५२ मतांवरच समाधान मानावे लागले. १८ महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीवेळी राज्यातील परिस्थिती वेगळी होती. परंतु त्यानंतर आघाडीमध्ये मोठी फाटाफूट झाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तुकडे होऊन अजित पवार हे महायुतीत सामील झाले. त्यामुळे मित्रपक्षात झालेल्या बदलाचा काहीअंशी फायदा झाला. महायुतीनेही एकदा पराभव झालेला असतानाही पुन्हा रासने यांच्यावरच विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते निवडून येतील की नाही याची उत्सुकता होती. मात्र महायुतीने ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. रासने यांच्या मेहनतीला फळ रवींद्र धंगेकरांचा त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळातील प्रभागात अगदी “ग्राऊंड लेव्हल कनेक्ट’ असला तरी सदाशिव, नारायण, शुक्रवार पेठ, नवीपेठेतील काही भाग या ठिकाणी तितका “कनेक्ट’ नाही. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बसून न राहता रासने यांनी देखील आपल्या प्रभागापुरता विचार न करता विधानसभा मतदार संघाच्या हद्दीचा विचार करून कामाचा विस्तार केला आणि मेहनत घेतली. भाजप कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने “हिंदू समाजाला मतदान’ असा प्रचार केला आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. अगदी घरोघरी जाऊन प्रचार केला. ज्या पंधरा नंबरच्या प्रभागात पोटनिवडणुकीत पडझड झाली होती तेथे दुरुस्ती केली आणि मताधिक्य मिळवले. …म्हणून भाजपला फायदा धंगेकरांना पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा तोटा झाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ती खदखद दिसून येत होती. तीच याहीवेळी त्यांना मारक ठरली. पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी थोपवण्यात त्यांना अपयश आले . त्याच बरोबरच धंगेकर यांना मताधिक्य देणाऱ्या १७ आणि १८ नंबरच्या प्रभागात रोखण्यात भाजपला यश आले. त्याचा परिणाम भाजपच्या विजयात झाला. उमेदवार – मिळालेली मते हेमंत रासने – ९० हजार ०४६ रवींद्र धंगेकर – ७० हजार ६२३ गणेश भोकरे – ४ हजार ८९४ नोटा – १२१३