गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, काँग्रेसची अधिकाऱ्यांकडे मागणी

vidhan parishad election । राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज 12 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हीसमोर मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान दोहोंकडच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार किंवा जास्त मतांची गरज भासणार आहे, असे दिसते. तर महायुतीला आपला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची गरज भासणार आहे. या मतांची जुळवाजवळ नेमकी कशी होणार? यात अपक्ष आमदारांचे महत्त्व किती? कोण पडद्याआडून मतदान करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात नुकत्याच फुटलेल्या पक्षातील आमदार कुणाच्या बाजूने निर्णय घेणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
अशात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे नाव चर्चेत आले आहे. कारण उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड तळोजा कारागृहातून आहेत मात्र आज निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते बाहेर येणार आहे. त्यांनी मतदान करू नये अशी मागणी काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहत केली आहे.
गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी मिळू नये, म्हणून काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदान करु शकत नाहीत, पत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु आहे. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस तळोजा कारागृहातून निघाले असल्याची माहिती समोर येत आहे.





