Kerala Congress : ‘कायदा-सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या’; काँग्रेसच्या निशाण्यावर आता CJI सूर्यकांत
Kerala Congress : दिल्लीतील आंदोलनांबाबतच्या वक्तव्यावरून केरळ काँग्रेसने सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर टीका केली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि SIR प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घ्या.

Kerala Congress : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे तुमचे काम नसेल, तर राजीनामा द्या. तुमच्या जागी दुसरी व्यक्ती शोधू,’ अशा शब्दांत केरळ काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीतील अलीकडच्या आंदोलनांबाबत सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने ही भूमिका मांडली.
केरळ काँग्रेसने वृत्तसंस्था पीटीआयच्या एका पोस्टला पुन्हा शेअर करत ही प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील आंदोलनांमुळे निर्माण झालेली परिस्थिती ही कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित असून, ती आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले होते.
सरन्यायाधीश सूर्यकांत नेमके काय म्हणाले?
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना दिल्लीतील अलीकडच्या आंदोलनांबाबत आणि आंदोलनांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला.
Dear Surya Kant,
If law and order is not your domain, resign now. We will find your replacement who can handle it. https://t.co/actjR9kOHs
— Congress Kerala (@INCKerala) October 12, 2026
यावर त्यांनी हा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विषय असल्याचे सांगितले. तसेच, तो आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत दिल्लीत अनेक आंदोलने झाली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलनांमधून करण्यात आली. मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधकांनी ही मागणी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार –
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने काढलेल्या मोर्चाबाबत आणि सरन्यायाधीशांची भेट घेण्याच्या मागणीबाबतही चर्चा झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सूर्यकांत यांनी सांगितले.
मात्र, निवडणुकीतील कथित अनियमिततेच्या आरोपांबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांना वैयक्तिक भेट देण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणावर न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागावी, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण आधीपासूनच न्यायालयात सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





