Kangana Ranaut । कंगनाविरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Kangana Ranaut – बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपची उमेदवार कंगना राणावत हिने शनिवारी कॉंग्रेसवर टीका केली. त्यावेळी तिने देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील पं.मोतीलाल नेहरू यांच्याविषयी टिप्पणी केली. त्यावर आक्षेप घेत कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
भाजपने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिली आहे. तिने प्रचाराचा भाग म्हणून एका मेळाव्यात भाषण करताना कॉंग्रेसवर निशाणा साधला. नेहरू पिता-पुत्रांविषयीही तिने काही वक्तव्ये केली. मोतीलाल नेहरू हे त्यांच्या काळातील अंबानी होते.
पण, त्यांची संपत्ती कुठून आली ते कुणालाच ठाऊक नाही. त्यांचे ब्रिटीशांशी जवळचे संबंध होते. त्यांना कुठून संपत्ती मिळाली ते अद्यापही गुपितच आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना कौल देणारे मतदान झाले. तसे असूनही जवाहरलाल नेहरू पंतप्रधान कसे काय बनले ते कुणालाच माहीत नाही, असे ती म्हणाली.
कंगनाची भाषणबाजी न रूचल्याने कॉंग्रेसने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. स्वातंत्र्यलढ्यात योगदान असणाऱ्यांची तुलना उद्योगपतींशी करून कंगनाने सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने दिग्गज नेत्यांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली, असा आरोप कॉंग्रेसने तक्रारीत केला.





