मणिपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला अटक आणि सुटका

इम्फाळ – मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ड्युटीवर असलेल्या एका मतदान कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली कॉंग्रेस उमेदवाराला अटक करण्यात आली, तथापि नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
कांगपोकपी जिल्ह्यातील सैतू मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार लामटिनथांग हाओकीप यांच्यावरील कारवाईचा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी निषेध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या कारवाईद्वारे लोकशाहीची हत्या केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
केथेलमन्बी मतदान केंद्राच्या पीठासीन अधिकाऱ्याने इम्फाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी कॉंग्रेस उमेदवारावर गुन्हा नोंदवला होता.सोमवारी सकाळी मतदान सुरू असताना त्यांना अटक करण्यात आली आणि मध्यरात्रीनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
भाजप समर्थकांनी बूथ कॅप्चरिंग आणि बोगस मतदान सुरू केल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर कॉंग्रेस उमेदवार मतदान केंद्रावर त्याची शहानिशा करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.तथापि कॉंग्रेसच्या उमेदवारावर भाजपच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली गेली असा कॉंग्रेस नेत्यांचा आरोप आहे.



