तरूण नेत्यांसाठी काँग्रेसचा उपक्रम, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने सुरू करणार फेलोशिप प्रोग्राम

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने एक फेलोशिप कार्यक्रम सुरु करणार असल्याची काँग्रेसने आज घोषणा केली. या कार्यक्रमाद्वारे दरवर्षी ५० तरुणांची निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या तरूणांना पक्षातील वरिष्ठ नेते विविध प्रकारचे प्रशिक्षण देतील. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्या तरूणांना पक्षाशी संबंधीत कार्यांमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय व्यावसायिक काँग्रेस विभागाने या फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टद्वारे ही योजना पोस्ट केली आहे.
या संदर्भात बोलताना, ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग फेलो प्रोग्रामद्वारे दरवर्षी देशातील ५० व्यावसायिकांना निवडण्यात येणार आहे. निवडण्यात आलेले व्यावसायिक तरूण हे त्यांच्या कारकिर्दिच्या मध्यावर असतील व त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये किमान १० पेक्षा जास्त वर्षे व्यवसाय केला असेल. निवड झाल्यानंतर त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल. या ५० जणांची निवड पक्षाच्या पॅनेलद्वारे एका सखोल निवड प्रक्रियेद्वारे केली जाणार असल्याचे चक्रवर्ती म्हणाले.
प्रवीण चक्रवर्ती पुढे म्हणाले की, निवडीनंतर या तरुणांना व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील. हा केवळ प्रवेश-स्तरीय इंटर्नशिप कार्यक्रम नाही. सार्वजनिक सेवेमध्ये कार्यरत असणार्या तरूणांसाठी हा कार्यक्रम आहे.
एआयसीसीचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू म्हणाले, आम्हाला प्रथम हे समजून घ्यायचे आहे की या व्यावसायिकांमध्ये कोणत्या प्रकारची शक्ती आहे आणि ते पक्षात कशा प्रकारचे योगदान देऊ शकतात. त्यानंतर आम्ही त्यांना राजकारणात येण्यासाठी त्यांच्यावर संस्थात्मक काम करणार आहोत. एका वर्षाच्या मार्गदर्शनाद्वारे, आम्ही त्या तरुणांना राजकारणातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित करू. असे तरुण खूप चांगले नेते बनतील आणि समाजात बदल घडवून आणण्यासाठी पक्षाला निर्णय घेण्यास ते सक्षम असतील यात शंका नाही, असे राजू म्हणाले.





