TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News
TOP 15 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी...!

TOP 15 News: 1. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुणे, नागपूर, अमरावती जागेसाठी तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघामधून आदिती पोहोरे यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी या नावांची घोषणा केली.दुसरीकडे मात्र अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.
2. ‘सत्ता हातात असताना पाणीप्रश्नासाठी योजना का राबवली नाही?’
भाजप नेत्याचा शरद पवारांना सवाल
शरद पवार हे सध्या बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. मात्र, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा केवळ राजकीय फायद्यासाठी आणि नातवाच्या राजकीय पायाभरणीसाठी आखण्यात आल्याचा गंभीर आरोप बारामतीतील भाजप नेते दिलीप खैरे यांनी एका पत्रातून केला आहे. सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतरही बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? संपला असेल तर आजही शेतकरी पाण्याच्या आशेने का बसला आहे? बारामतीला विकासाचे मॉडेल मानताना झालेले काम स्व. अजितदादांचे आहे हे आपण मान्य कराल का? एवढी वर्षे सत्ता हातात असताना बारामतीच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्नासाठी दीर्घकालीन योजना का राबवली नाही? असे सवाल खैरे यांनी उपस्थित केले आहेत.
3. 50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
मुंबईतील CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. वडाळ्यातील भूखंडासाठी NOC देण्यासाठी 1 कोटींची लाच मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. अखेर या व्यवहारात लाचेची रक्कम 70 लाखांवर ठरली आणि CPWD अभियंत्याचा नातेवाईक यातील 50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील वाशी येथे लाच प्रकरणात कार्यकारी अभियंत्यालाही अटक करण्यात आली, मुंबईतील रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष, मॅनेजर आणि NOC मागणाऱ्या फर्मचा पार्टनरही अटकेत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद न करता 50 लाखांच्या बदल्यात भूखंडासाठी NOC दिल्याचे तपासात समोर आले.
4. पावसाची उघडीप! तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता
राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. येत्या काही दिवसात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक स्थिती निर्माण होत असल्याने राज्यातील पावसाळी वातावरण हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सकाळी आणि रात्री तुलनेने थंड वातावरण, तर दुपारच्या वेळी वाढता उकाडा असा अनुभव काही भागांत येऊ शकतो. दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
5. ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा प्रयत्न’
चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालना जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे सोयाबीन पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जालना शहरात येऊन नागरिकांची निवेदनंही स्वीकारली. दरम्यान, शरद पवार म्हणतील त्या GRप्रमाणे काम करू, असं आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिलं. विरोधी पक्षांच्या सर्व सूचनांचे निराकरण केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.शेतकऱ्यांना दिवाळीच्या आतच प्रत्यक्ष मदत देण्याचा सरकारचा विचार आहे. सर्व निकषांचा विचार करून जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
6. ‘1972 च्या दुष्काळापेक्षाही यंदाची परिस्थिती गंभीर’ माजी आमदाराचा दावा
धुळे जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 1972 च्या दुष्काळापेक्षाही यंदाची परिस्थिती भयानक असल्याचा दावा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. दुष्काळाच्या झळांनी धुळे जिल्ह्यातील शेती अक्षरशः होरपळून निघाली आहे. कापूस, मका, बाजरी, ज्वारी आणि भुईमूग यासह उभी पिके पाण्याअभावी करपून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांत जमिनीतून सातत्याने पाण्याचा उपसा झाला; मात्र भूजल पुनर्भरणाकडे दुर्लक्ष झाल्याने आज भूजलसाठा संपुष्टात आल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जनावरांसाठी 100 टक्के अनुदानावर हायड्रोपोनिक चारा आणि सायलेज निर्मितीची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
7. “निवडून येणं एवढं सोपं नसतं…”; उदय सामंतांचे विधान
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना निवडून येण्यामागचं राजकीय गणित, जनतेशी असलेला संपर्क आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील आव्हाने यावर मिश्कील शैलीत भाष्य केले. “निवडून येण्यासाठी फक्त लोकप्रियता पुरेशी नसते…” अशा आशयाच्या वक्तव्यांतून उदय सामंत यांनी निवडणुकीच्या राजकारणावर केलेल्या भाष्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भाषणादरम्यान सामंत यांनी “निवडून येणं…” या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याला उपस्थितांकडूनही प्रतिसाद मिळाला. मात्र त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, यावरूनही राजकीय चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
8. …तर 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार; CJPचा इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉकरोच जनता पार्टी चे नेते अभिजीत दिपके यांनी दिला आहे. गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJPकडून आंदोलन करण्यात आलं. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी CJPने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने तरुण शिवाजी पार्कमध्ये पोहोचले. यावेळी बोलताना दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांनी पद सोडलं नाही, तर दिल्लीत आता ‘जंतर-मंतर 2.0’ आंदोलन होईल, असं सांगितलं होतं. दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर ज्या ठिकाणी पोलीस त्यांना थांबवतील, तेच ठिकाण आमच्यासाठी जंतर-मंतर असेल, असंही दिपके यांनी म्हटलंय.
9. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नवरात्री आधी 1500 रुपये जमा
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्याता जमा झाला आहे. रक्षाबंधन आधी जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता नवरात्री आधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ऑगस्टचा हप्ता मिळण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. लाभार्थी बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण अद्याप सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.
10. ठाकरे बंधूंचा उद्या महामोर्चा! मार्गात बदल
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रविवारी ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त महामोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र आता या महामोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. गुरुवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मोर्चाच्या मार्गात बदल करण्याची विनंती केली. त्यानुसार आता मेट्रो सिनेमापासून रविवारी सकाळी 11 वाजता सुरूवात होऊन मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयासमोर येणार असल्याची माहिती उद्धवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रपरिषदेत दिली. यापूर्वी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
11. कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी कॉकपिटचा दरवाजा उघडून मदत मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा थरारक अनुभव सांगितला. या प्रसंगाचे वर्णन करताना मच्छार भावूक झाले. ‘देवाने मला वाचवले,’ असे त्यांनी मोदींना सांगितले. संकटाच्या वेळी त्यांनी हनुमानाची प्रार्थनाही म्हटल्याचे सांगितले. मच्छार यांच्या शौर्याची गाथा पाहून जगभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच आता देशाचं नाव उंचावणाऱ्या कॅप्टन स्मित माछर यांनीही हनुमान चालिसाचा दाखला दिल्यानं आता पुन्हा नवी चर्चा देशभरात सुरू झाली आहे.
12. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खेळाडूची नियुक्ती
कॉंग्रेसने पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी परगत सिंग यांची नियुक्ती केली. ते भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विधानसभा निवडणूक होईल. त्याआधी कॉंग्रेसच्या पंजाब शाखेतील गटबाजी उफाळून आली. एका गटाने अमरिंदर सिंग राजा वारिंग यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याला तीव्र विरोध दर्शवला. अखेर गटबाजी संपुष्टात आणण्याच्या उद्देशातून कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. तो मान्य करत वारिंग यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून परगत यांच्या नावाची घोषणा केली. हॉकीपटू म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या परगत यांनी काही वर्षांपूर्वी शिरोमणी अकाली दलाच्या माध्यमातून राजकीय मैदानात उडी घेतली. नंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पक्षाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
13. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर, मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका?
अमेरिकेने फारसच्या खाडीत ‘USS थियोडोर रूजवेल्ट’ ही नवी युद्धनौका आणि १०,००० सैनिकांची तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही युद्धनौका रविवारी मध्य पूर्वेच्या दिशेने रवाना झाली असून तिच्या आगमनानंतर या क्षेत्रात अमेरिकेच्या एकूण तीन विमानवाहू युद्धनौका तैनात होतील. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणने सुरवातीला ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा सागरी मार्ग बंद केला होता; त्यानंतर अमेरिकेनेही या भागात नाकेबंदी केली. परिणामी, या मार्गावरून होणारी कच्च्या तेलाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गाने होणारी कच्च्या तेलाची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. यातच आता या नाकेबंदीमुळे आधीच तेलपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला असताना, अमेरिकेच्या नव्या लष्करी तैनातीमुळे हा संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विश्वचषकात रंगणार ‘सुपर-७’चा नवा थरार! ७ व्या संघासाठी फुटबॉल वर्ल्डकपसारखा नियम; आयसीसीच्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता
14. भारत आणि पाकिस्तान २०२७च्या वनडे विश्वचषकासाठी एकाच गटात
आयसीसीने आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२७ चे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर या स्पर्धेच्या अनोख्या आणि रंजक फॉरमॅटचा उलगडा झाला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या १४ व्या हंगामात १४ संघ सहभागी होणार असून एकूण ५७ सामने खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ २०२७च्या वनडे विश्वचषकासाठी एकाच गटात आहेत. दोन्ही संघांचा ग्रुप A मध्ये समावेश असून या गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर A या संघांचाही समावेश आहे. तर गट B मध्ये बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि क्वालिफायर B या संघांचाही समावेश आहे.
15. मिठी नदी उपसा गाळ प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाला अटक
मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया याला अटक करण्यात आली आहे. वांद्रे इथल्या अभिनेत्याच्या निवासस्थानी सुमारे आठ तास चाललेल्या चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मिठी नदी गाळ प्रकरणाच्या तपासात डिनो मोरियाचे नाव आरोपी व्यक्तींशी संबंधित असल्याने त्याच्यासोबत चौकशी करण्यात येत आहे. . या प्रकरणात मुंबई महापालिकेला ६५.५४ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप तपास यंत्रणेने नोंदवला आहे. २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील गाळ उपसा कामांशी संबंधित कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि गाळ वाहतूक व विल्हेवाटीच्या प्रक्रियेतील अनियमिततेमुळे हा गैरव्यवहार निदर्शनेस आला.
हेही वाचा:







