नवी दिल्ली – कॉंग्रेसने नेहमीच राज्यघटनेपेक्षा सत्तेला अधिक महत्व दिले. त्या पक्षाला कधीच घटनात्मक संस्थांची स्वायत्तता सहन झाली नाही. त्या पक्षाने घटनात्मक मुल्ये उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला, असे टीकास्त्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सोडले. लोकसभेत राज्यघटनेवरील दोन दिवसीय चर्चेचा प्रारंभ करताना राजनाथ यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राज्यघटना म्हणजे देशाला आपणच दिलेले योगदान असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जातो. त्यातून तो पक्ष अनेक नेत्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करतो. राज्यघटनेच्या रक्षणाची भाषा कॉंग्रेसला शोभत नाही. सध्या अनेक विरोधी पक्षनेते राज्यघटना त्यांच्या खिशांत ठेवतात. त्याउलट, भाजप राज्यघटनेपुढे नतमस्तक होतो. घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेशी भाजपने कधीच खेळ केला नाही. केंद्रात अनेक दशके सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेसने वारंवार घटनादुरूस्त्या केल्या. त्यामागे राज्यघटनेत हळूहळू बदल करण्याचा हेतू होता. त्याउलट, घटनात्मक मुल्ये मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या सबलीकरणासाठी मोदी सरकारने घटनादुरूस्त्या केल्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. आणीबाणीचीही आठवण करून देत त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. राज्यघटनेवरील चर्चेला उद्या (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.