Congo News : कॉंगोमध्ये बोट बुडून 38 जणांचा मृत्यू; 100 पेक्षा जास्त जण बेपत्ता

किन्शासा (कॉंगो) : कॉंगोमध्ये एक प्रवासीबोट बुडून झालेल्या दुर्घटनेत किमान ३८ जणांना जलसमाधी मिळाली आहे. त्यापैकी २८ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. या बोटीतून प्रवास करणारे १०० पेक्षा जास्त प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. ख्रिसमससाठी घरी परत येत असलेले लोक बुसिरा नदीतून ओलांडण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते.
या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले असल्यामुळे ही बोट बुडाल्याचे स्तानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. दुर्घटनेतील २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बोटीमध्ये ४०० पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. इंगेन्डे आणि लुलो या दोन बंदरांमधील प्रवाशांना घेऊन ही बोट बोएन्डे येथे जात होती. त्यामुळे प्रवाशांची संख्या जास्तहोती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
चारच दिवसांपुर्वी अशीच एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत २५ जण मरण पावले होते. तर ऑक्टोबर महिन्यात बोट बुडून ७८ आणि जून महिन्यातल्या दुर्घटनेत ८० जणांना जीव गमवावा लागला होता.





