Nagar | फौजदारी कायद्यातील कलम अभ्यासण्यासाठी गोंधळ

नेवासा, (प्रतिनिधी) – १ जुलैपासून नवीन तीन फौजदारी कायदे लागू करण्यात आल्यामुळे पोलीस आणि वकील मंडळी चांगलीच बुचकळ्यात पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कायद्यातील नवीन कलमे पाहण्यासाठी चक्क पोलीस आणि वकील मंडळी नवीन तीन फौजदारी कलमाचे पुस्तक उचकाटून पाहताना दिसून येत आहे.
त्यामुळे जुने कलमे तोंडपाठ असलेल्या पोलीस आणि वकिलांना तीन फौजदारी कायद्यातील नवीन कलमासाठी पुस्तकात पाहूनच कामकाज करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
नवीन कायद्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहे. नवीन कायद्यानुसार कोणते कलम आहेत, हे पाहण्यासाठी पोलीस आणि वकील मंडळी चांगलीच गोंधळून जात असल्याचे दिसून येत आहे.
कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय परिसरात कायद्यात बदल झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके हे कलम कोणत्या गुन्ह्यात वापरले गेले, उलगडा करण्यासाठी वकील मंडळीकडे धाव घ्यावी लागत आहे.
त्यामुळे हे बदल समजून घेण्यासाठी जुने कलम आणि नवीन कलम यासाठी वकील मंडळी आपल्या डायरीत नोंद करत आहे. इटपट आकलन होण्यासाठी आपल्या खिशातील डायरीत संकलन करताना ठेवत आहेत.





