नवी दिल्ली : मणिपूरमधील दोन महिलांच्या व्हिडीओमुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याचेच पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील पडताना दिसून येत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनेकदा कामकाज थांबवावे लागले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यसभेचे आजचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. मात्र यावेळी संभापतींनी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांना चांगलेच सुनावले असल्याचे दिसून आले.
आज सकाळी राज्यसभेत सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर खुद्द उपराष्ट्रपती अर्थात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. “मला आज ४७ नोटिसा आल्या आहेत. या सर्व नोटिसा मणिपूरमधील परिस्थितीवर सदस्यांच्या भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ही परिस्थिती दिसून येत आहेत. मोठ्या संख्येनं सदस्य ४७ व्या नियमाचा वापर करून हाच मुद्दा उपस्थित करत आहेत. मी २० जुलै २०२३ रोजी सभागृहाला सांगितलं आहे की यावर अल्पकालीन चर्चा होईल. केंद्र सरकारनंही या चर्चेची तयारी दाखवली आहे. पण माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपल्या या सभागृहातील कृतींमुळे मोठ्या संख्येनं नागरिकांना प्रेरणा मिळायला हवी”, असे म्हणत सभापतींनी विरोधकांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
“दररोज जर सभागृहात तीच परिस्थिती निर्माण झाली, तर त्यातून आपल्याबद्दलचा जनतेमधला आदर कमी होईल. माझ्याकडे येणाऱ्या अर्जांमध्ये यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मी या सभागृहाला विनंती करतो की त्यांनी पक्षीय राजकारणातून बाहेर पडून अशा पद्धतीने काम करायला हवं की या मुद्द्यावर अल्पकालीन चर्चा शक्य होऊ शकेल. याच्या परिणामांकडे बघा. प्रश्नोत्तराच्या तासाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासाची चर्चा होऊ द्यावी”, असेही जगदीप धनखर यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या मुद्द्यावरून आक्रमकपणे भूमिका मांडायला सुरुवात केली. “सभापती जे सांगतायत, ते आम्हाला माहिती आहे. मी नियमानुसारच बोलतोय”, असे म्हणत डेरेक ओब्रायन यांनी जोरात टेबल वाजवला. “ओब्रायन यांचा पवित्रा पाहून सभापती जगदीप धनखर चांगलेच संतापले. “तुम्ही नीट ऐकलं तर तुम्हाला मी काय सांगतोय ते कळेल. डेरेक ओब्रायन, असा ड्रामा करणं ही तुमची सवयच झाली आहे. तुम्ही प्रत्येक वेळी तेच करता. तुम्हाला वाटतं की हा तुमचा विशेषाधिकार आहे. तुम्ही किमान एक करू शकता, की सभापतीपदाचा थोडा आदर राखा. तुम्ही प्रत्येक वेळी उठून ड्रामा करता. टेबल वाजवू नका. आपण हे सहन करू शकत नाही”, असे म्हणत सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.