वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात गोंधळ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”हा सामंजस्य करार…”

नवी दिल्ली : वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापले आहे. प्रकल्प गुजरातला जाणे म्हणजे हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली तर सत्ताधाऱ्यांनी मागील सरकारवर याचे खापर फोडले. दरम्यान, या प्रकल्पावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “हा सामंजस्य करार भारतामध्ये सेमीकंडक्टर्स निर्मितीला वेग देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ही एक कोटी ५४ लाखांची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सहाय्यक उद्योगांसाठी एक प्रचंड परिसंस्था तयार होईल. याचा फायदा मध्यम आणि लघू उद्योगांना होईल,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
This MoU is an important step accelerating India’s semi-conductor manufacturing ambitions. The investment of Rs 1.54 lakh crore will create a significant impact to boost economy and jobs. This will also create a huge ecosystem for ancillary industries and help our MSMEs. https://t.co/nrRbfKoetd
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2022
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत समूहाने प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे. याबाबत ‘एमआयडीसी’शी प्राथमिक चर्चा सुरू होती.
पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे बैठकीतील सादरीकरणावेळी सांगण्यात आले होते. हा उद्योग महाराष्ट्रात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्यही घेण्यात येणार आहे, असे सांगत सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकल्पासाठी गुजरात सरकारने १ हजार एकर जमीन विनाशुल्क देऊ केली आहे. तसेच वीज व पाणी सवलतीच्या दरात आणि तेही २० वर्षांसाठी एकाच दराने देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण, गुजरातच्या महाशक्तीपुढे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. यापूर्वीही २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची अॅपल कंपनीशी निगडीत गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी त्यांना यश आले नव्हते. याबाबत फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.





