पुणे | निकालात घोळ, पालकांचा संताप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा फुगवटा नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
नीटचा पेपर फुटल्यानेच काही ठराविक विद्यार्थ्यांना अनपेक्षित गुण मिळाले आहेत. त्यावरुन पालकांचा संताप अनावर झाला आहे. एवढेच नव्हे, तर काही पालक सर्वोच्च व उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एनटीएने सर्व खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
नीटचा निकाल १४ जूनला असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी अचानकपणे नीटचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशी निकालाची आकडेवारी समोर आल्यानंतर पालकांमधून संतापाची लाट उसळली. २०२३ मध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले असताना यंदा त्यात भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीए, आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी नीट ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी मिळून ५४९ महाविद्यालयांच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १ लाख ७० हजारांनी वाढ झाली आहे.
गतवर्षीच्या नीटच्या निकालात ७०० गुणांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३५० होती. या निकालात मात्र ही संख्या अडीच हजारांवर गेली आहे. तसेच ६०० पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्याची संख्या गतवर्षी २८ हजार होती. यावेळेस ही संख्या ८१ हजारांवर गेली आहे. यावरुन पेपर फुटल्याच्या शंकेला वाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनटीएने सर्व स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. – प्रा. दुर्गेश मंगेशकर, संचालक. आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्र
पालकांचे प्रश्न…
– पेपर फुटल्यानेच निकालात वाढ
– ग्रेस गुणांचे निकष स्पष्ट नाहीत
– निकाल लवकर जाहीर करण्याची घाई
– एनटीएने वाढलेल्या निकालाचे स्पष्टीकरण द्यावे
– ७२० पैकी ७१८ गुण कसे मिळतात
– प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करावेत





