अर्मेनिया-अझरबैजानमध्ये संघर्ष पेटला

येरेआन (अर्मेनिया) – अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानच्या वादग्रस्त भूभागावरून दोन्ही देशांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. नागोरनो-कराबख या विभाजनवादी भूभागावरून हा संघर्ष पेटला असून अझरबैजानची दोन हेलिकॉप्टर आपण पाडली असल्याचे अर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
अझरबैजानचे तीन रणगाडेदेखील उडवून देण्यात आले असल्याचे अर्मेनियाच्या लष्कराच्या प्रवक्त्या सुशान स्टेपान्यान यांनी म्हटले आहे. मात्र या कारवाईदरम्यान कितीजण ठार झाले, हे समजू शकलेले नाही.
आपल्या 2 हेलिकॉप्टर आणि 3 रणगाड्यांना अमेरिकेने लक्ष्य केले असल्याच्या वृत्ताचे अझरबैजानने खंडन केले आहे. मात्र अर्मेनियाच्या बॉम्ब हल्ल्यात अझरबैजानच्या सैन्याची आणि नागरिकांचीही हानी झाली आहे, असे अध्यक्ष इल्हाम अलियेव यांनी देशवासियांना उद्देशून टिव्हीवरून केलेल्या संबोधनात म्हटले आहे.
रविवारी अझरबैजानने केलेल्या हल्ल्यामुळेच संघर्षाला सुरुवात झाली, असे स्टेपान्यान यांनी म्हटले आहे. मात्र अझरबैजानने बरोबर विरुद्ध दावा केला आहे. तुर्कीने अर्मेनियाच्या हल्ल्याचा निषेध करणारे ट्विट केले आहे. या संघर्षात तुर्की अझरबैजानला सहकार्य करेल, असेही तुर्कीच्या सत्तारुढ पक्षाच्या प्रवक्त्याने आणि अध्यक्षांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.





