युक्रेनच्या मदतीसाठी अल्बानियामध्ये युरोपातील देशांची परिषद..

नवी दिल्ली – युक्रेनला मदत देण्यासाठी अल्बानियामध्ये आज एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून अल्बानिया सरकार बरोबर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी हे या परिषदेचे सहयजमान आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला दोन वर्षे झाल्याच्यानिमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी झेलेन्सकी काल सौदी अरेबियाच्या दौर्यावरून अल्बानियामध्ये काल मध्यरात्रीच दाखल झाले आहेत. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि रशियाच्या तुरुंगातील युक्रेनच्या कैद्यांच्या सुटकेच्या मुद्यावर यावेळी भर दिला जाणार आहे.
झेलेन्सकी यांनी आज अल्बानियाचे पंतप्रधान इडी रामा यांची भेट घेतली आणि चर्चा केली. या भेटीदरम्यान संरक्षण आणि राजकीय सहकार्याच्या मुद्यावर चर्चा अपेक्षित असल्याचे इडी रामा यांनी या भेटीपूर्वीच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. युक्रेनमध्ये दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता प्रस्थापनेबरोबर स्वीत्झर्लंडमध्ये वैश्विक शांतता परिषद आयोजनाबाबतही चर्चा केली जाणार असल्याचेही रामा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
युक्रेन आणि अल्बानियामध्ये संरक्षण आणि मैत्रीच्या करारावरही दोन्ही नेत्यांनी स्वाक्षर्या केल्या. युक्रेनमधील योगदानासाठी झेलेन्सकी यांनी रामा यांचा यारोस्लाव द वाईज या पदकाने सन्मान देखील केला. रामा यांनी युक्रेनला अल्बानियाचा पाठिंबा असल्याचेही यावेळी जाहीर केले.रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनचे आतापर्यंत ३१ हजार सैनिक शहिद झाले आहेत, असे झेलेन्सकी यांनी यावेळी सांगितले.
अल्बानियातील परिषदेला एकूण ११ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यात युक्रेनच्या शेजारील काही देशांचाही समावेश आहे. तर ३ देशांनी आपले संदेश या परिषदेसाठी पाठवले आहेत. युरोपीय संघ आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीही या परिषदेला उपस्थित आहेत.
शस्त्र उत्पादन वाढवण्याचे आवाहन
झेलेन्की यांनी पाश्चात्य देशांना युक्रेनसाठीचे शस्त्र आणि दारुगोळ्याचे उत्पादन वाढवावे. तसेच युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा सक्षम करण्यासाठी मदत करावी आणि रशियावर अधिक निर्बंध घालून दबाव आणण्याचे आवाहन केले. युक्रेनमध्ये प्रत्यक्ष सैन्य पाठवण्याची अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीची कोणतीही योजना नसल्याचे नाटोच्या प्रमुखांनी म्हटले आहे. जर्मनी, पोलंड आणि अन्य मित्र देशांनीही तसेच मत व्यक्त केले आहे.




