‘मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्या…’; मनोज जरांगे यांची मागणी

Manoj Jarange Patil – मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतरही जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
आजपासून (10 फेब्रुवारी ) सकाळी 10 वाजतापासून मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाज बांधवांनी आपापल्या आमदारांना आजपासून फोन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आरक्षणाविरोधात जो बोलेल त्यांना आता त्यांच्या पक्षाचे नाव घेऊन उघड करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी जरांगेनी केली आहे. येत्या 15 तारखेपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे.
त्याआधी दोन दिवस मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने अहवाल दिला आहे, तो देखील सरकारने स्वीकारावा, यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची त्यांची मागणी आहे.
मराठा समाज बांधवांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना आजपासून फोन करावे आणि मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी. तसेच आमदारांनी मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे अशी विनंती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.





