Pune Ganeshotsav 2025 : शंखनाद, ढोल-ताशा अन् मोरयाचा जयघोष…! भक्तीमय वातावरणात पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरूवात

Pune Ganeshotsav 2025 : आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यनगरीत सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मुरवणुकीला आता सुरुवात झाली आहे. पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे शंखनाद, ढोल-ताशा अन् मोरयाचा जयघोष प्रसन्न वातावरणात स्वागत करण्यात आले असून, या गणपतीची मिरवणूक सुरु आहे. यंदाचा गणेशोत्सव खास असणार आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता या उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.
मानाचा पहिला गणपती : श्री कसबा गणपती
मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून श्रींची मिरवणूक सकाळी १० वाजता निघाली. दरवर्षीप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करण्यात आली होती. रास्ता पेठ पॉवर हाउस, अपोलो थिएटर चौक, दारूवाला पूल, देवाजी बाबा चौक, फडकेहौद मार्गे उत्सव मंडपात आगमन झाले. या मिरवणुकीत संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम ढोल ताशा पथक, अभेद्य ढोल ताशा पथक यांचा सहभाग दिसून आला. मूर्तीची प्रतिष्ठापना सवितानंद महाराज यांच्या हस्ते ११ वाजून ३७ मिनिटांनी करण्यात येणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. पुण्याच्या रस्त्यांवर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने वाद्यनाच्या गजरात या गणपती मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मोरया मोरयाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमला.
यंदाचा आकर्षक देखावा
आकर्षक फुलांच्या रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मंडळाकडून यंदा केरळच्या पद्नाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुख्य मंदिरातून उत्सव मंडपात मूर्ती विराजमान होणार आहे. मूर्ती उत्सव मंडपात विराजमान झाल्यावर केली प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.





