देशात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी ९ रुग्ण सापडल्याने चिंता वाढली

नवी दिल्ली – भारत सरकारने काल दोन करोना लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याची दिलासादायक बातमी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आज करोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत हाती आलेली माहिती देशवासीयांची चिंता वाढवणारी ठरली आहे.
देशातील करोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३८ इतकी झाली असून ही संख्या १ जानेवारीला २९ इतकी होती. करोनाचा हा नवा स्ट्रेन आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
करोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन प्रथम ब्रिटन येथे आढळून आला होता. विषाणूचा हा प्रकार ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याने भारतासह अनेक देशांनी ब्रिटन येथून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध लादले आहेत.
नव्या विषाणूची बाधा झालेल्या ३८ रुग्णांपैकी १० जणांचे नमुने NIMHANS बंगळुरू येथे, ३ जणांचे नमुने CCMB हैद्राबाद येथे, पाच जणांचे नमुने NIV पुणे येथे, ११ जणांचे नमुने IGIB दिल्ली येथे, ८ जणांचे नमुने NCDC दिल्ली येथे तर एकाचा नव्या विषाणूसाठीचा अहवाल NCBG कोलकाता येथे पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, करोनाच्या या नव्या स्ट्रेनला वेळीच रोखण्यासाठी प्रशासनाने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे’ काम युद्धपातळीवर हाती घेतले असून याद्वारे बाधित, बाधितासह प्रवास केलेले प्रवासी, बाधितांचे कुटुंबीय यांची वाद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचं सांगण्यात आलं असून परिस्थिती हातल्याणासाठी राज्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असल्याची माहिती दिली आहे.





