Ajit Navale : माकपच्या राज्यसचिवपदी कॉ.अजीत नवले यांची निवड

वर्धा : सेलू येथे सुरू असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४व्या राज्य अधिवेशनाचा समारोप नुकताच पार पडला. या अधिवेशनात पक्षाच्या राज्यसचिवपदी कॉ. अजीत नवले यांची निवड करण्यात आली आहे. सेलू येथे गुरुवारपासून माकपचे राज्य अधिवेशन सुरू होते. माकपच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉ. प्रकाश कारत यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले.
दुसऱ्या दिवशी माकपच्या अधिवेशनाला पाठिंबा देण्यासाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, लाल निशाण पक्षाचे भीमराव बनसोड, भाकपचे राज्य सचिव राम बाहेती, अजीत पाटील, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस किशोर ढमाले आदींचा यात समावेश होता.
भाकपचे राम बाहेती म्हणाले, जातीय व धर्मांध शक्तींनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. ज्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या नावाचा जयघोष होतो त्याच महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्याचवेळी गरीब, कष्टकरी, अल्पसंख्याकांवरील अन्याय वाढत चालला आहे. एकीकडे धर्मांध शक्तीचे आव्हान आणि दुसरीकडे कार्पोरेट भांडवलशाहीचे आव्हान अशी सध्याची दोन संकटे आहेत असे बाहेती म्हणाले. समर्थ राजकीय पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व डाव्या पक्षांनी आपली भक्कम एकजूट केली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.





