पुणे | कमांड हॉस्पिटलमध्ये कानाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने दोन पायझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट (बीसीआय) शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया आयोजित करणारे हे पहिलेच सरकारी हॉस्पिटल आहे.
कर्नल डॉ. राहुल कुरकुरे, न्यूरोटोलॉजिस्ट आणि इम्प्लांट सर्जन कर्नल डॉ. नितू सिंग, वरिष्ठ सल्लागार आणि एचओडी (ईएनटी) यांच्या मार्गदर्शनाखाली कमांड हॉस्पिटल (एससी) येथे या रुग्णांवर यशस्वीरित्या रोपण करण्यात आले.
जन्मजात बाह्य आणि कानाच्या आतमध्ये समस्या असलेल्या एका सात वर्षांच्या मुलावर पायझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट शस्रक्रिया करण्यात आली. याशिवाय एका प्रौढवयीन व्यक्तीवरही श्रवणशक्ती कमी झाल्याने (सिंगल साइडेड डेफनेस) अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे अशाप्रकारची शस्त्रक्रिया करणारे हे पहिले सरकारी रुग्णालय आहे.
पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज हे न्युरोटोलॉजी केंद्र आहे. येथील कान, नाक, घसा विभागामध्ये श्रवणदोषांसंबंधी अनेकप्रकारचे उपचार केले जातात. या शस्रक्रियांसाठी अनेक महागडी उपकरणे लागतात. या सगळ्याची व्यवस्था या रुग्णालयात करण्यात आली आहे.
अॅक्टीव्ह पीझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हियरिंग इम्प्लांट सिस्टीम हे श्रवणक्षम रूग्णांसाठी प्रत्यारोपण करण्यायोग्य वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे उपकरण आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नाही. त्यामुळे त्याचीही व्यवस्था रुग्णालयाने रुग्णांसाठी मोफत करून दिली.
कंडक्टिव्ह/मिश्र श्रवणशक्ती कमी झालेले रुग्ण किंवा एकतर्फी बहिरेपणा असलेले अनेक रुग्ण आहेत. त्यांना केवळ श्रवणयंत्र लावल्याने फायदा होत नाही. अशा रुग्णांंचा श्रवणदोष कमी करण्यासाठी आणि चांगला परिणाम साधण्यासाठी उपरोक्त प्रकारची शस्त्रक्रिया केल्याने फायदा होतो. लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग आणि लेफ्टनंत जनरल अरिंदम चटर्जी यांनी याबाबत रुग्णालयाचे अभिनंदन केले.




