Iran restores Strait of Hormuz : लेबनॉन आणि इस्रायलमधील १० दिवसांच्या युद्धविरामानंतर पश्चिम आशियातून एक मोठी सकारात्मक बातमी समोर येत आहे. लेबनॉनमधील शस्त्रसंधीचा आदर राखत इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सर्व व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू असेल, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांना विनाअडथळा प्रवास करता येईल. मार्ग खुला केला असला तरी, इराणने काही सुरक्षा निर्बंध कायम ठेवले आहेत. जहाजांना केवळ इराणने आखून दिलेल्या ‘समन्वयित मार्गावरूनच’ (Coordinated Route) प्रवास करावा लागणार आहे. इराणने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, जोपर्यंत लेबनॉनमध्ये युद्धविराम होत नाही, तोपर्यंत कोणत्याही करारावर चर्चा होणार नाही. त्यामुळे ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. हेही वाचा – “देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न”; लोकसभेत राहुल गांधींचा हल्लाबोल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या ‘ट्रुथ सोशल’ अकाऊंटवर त्यांनी लिहिले की, “इराणने आताच घोषित केले आहे की, इराणची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असून वाहतुकीसाठी तयार आहे. धन्यवाद!” दोन्ही देशांचे नेते व्हाईट हाऊसमध्ये – गुरुवारी अमेरिकेच्या पुढाकाराने लेबनॉन आणि इस्रायलमध्ये १० दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. या युद्धविरामाचा मुख्य उद्देश केवळ तात्पुरती शांतता नसून, इराणसोबत सुरू असलेला संघर्ष कायमचा संपवणे हा आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील ४ ते ५ दिवसांत दोन्ही देशांचे नेते व्हाईट हाऊसमध्ये एका ऐतिहासिक बैठकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक बाजारपेठ आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.