Pune District : रस्त्याचे काम चार महिन्यांत पूर्ण करा ; उपसभापती सचिन अहिरांकडून पाहणी
Pune District : या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड तसेच इतर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत आहे.

चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग कंपनीजवळील रखडलेल्या रस्त्याच्या कामाची विधानपरिषदेचे उपसभापती सचिन आहिर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकरी, रस्त्यासाठी कार्यरत कृती समितीचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा करून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. रखडलेले काम गतीने पूर्ण करून येत्या चार महिन्यांत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिले.
गेल्या काही काळापासून कॉर्निंग कंपनीजवळील रस्त्याचे काम रखडल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आहिर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामात येणार्या अडचणी, प्रलंबित बाबी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकार्यांकडून माहिती घेतली.
यावेळी तळेगाव-चाकण रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, आणखी सुमारे तीन महिन्यांत रस्ता वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता संबंधित अधिकार्यांनी व्यक्त केली. तळेगाव-चाकण मार्ग हा औद्योगिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड तसेच इतर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच चाकण औद्योगिक क्षेत्रातील दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
रस्त्यांची कामे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून रखडलेली कामे मार्गी लावावीत आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. कॉर्निंग कंपनीजवळील रस्त्यासाठी अधिकार्यांनी दिलेली चार महिन्यांची, तर तळेगाव-चाकण रस्त्यासाठी तीन महिन्यांची मुदत प्रत्यक्षात पाळली जाते की नाही, याकडे आता स्थानिक नागरिक, शेतकरी आणि वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.
पीएमआरडीएच्या मंजूर रस्त्यांवरही चर्चा
पाहणीदरम्यान परिसरातील इतर पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. विशेषतः पीएमआरडीएने मंजूर केलेले प्रमुख रस्ते, त्यांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि भविष्यातील वाहतुकीची गरज याबाबत संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेण्यात आली. शेतकरी आणि कृती समितीच्या प्रतिनिधींनी रस्त्यांच्या कामामुळे निर्माण होणार्या स्थानिक समस्या तसेच नागरिकांना भेडसावणार्या विविध अडचणी उपसभापती आहिर यांच्या निदर्शनास आणून दिल्या.





