बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांविरोधात आंतरराष्ट्रीय लवादाकडे तक्रार

ढाका – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य २६ जणांच्याविरोधात आज आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल झालेल्या अन्य व्यक्तींमध्ये हसीना यांच्या कार्यकाळातील काही मंत्र्यांचाही समावेश आहे. वांशिक नरसंहार आणि मानवतेविरोधात गुन्हे केल्याच्या आरोपाखाली ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अलिकडेच झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शहरयार हसन अल्वी या मुलाच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. हसीना यांच्यावतीने सुमारे ५०० जणांविरोधात आयसीजेच्या तपास एजन्सीकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारींमधील इतर प्रमुख आरोपींमध्ये माजी मंत्री ओबेदुल कादर, रशीद खान मेनन, हसनुल हक इनू आणि माजी पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) अब्दुल्ला अल मामून यांचा समावेश आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीबरोबर काही वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणेही कागदपत्रांबरोबर जोडली आहेत.
आंदोलनादरम्यान झालेल्या हत्यांबाबत हसीना यांच्या सरकारमधील सर्व संबंधितांविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाकडे तक्रार केली जाईल, असे बांगलादेशातील हंगामी सरकारने अलिकडेच म्हटले होते. हसीना यांचे सरकार पडल्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेशमध्ये २३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या आंदोलनामध्ये एकूण ६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या तपास संस्थेकडे हसीना आणि इतर आठ जणांविरुद्ध वेगळी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यातही नरसंहार आणि मानवतेविरोधातील गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायाधिकरणाने बुधवारी या प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतरांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे.





