पंतप्रधान मोदींविरोधात आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार, हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप

Pm Narendra Modi – आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील पलानाडू येथील लोकसभेची जागा असलेल्या चिलकलुरिपेट येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी केला आहे. (Complaint of violation of code of conduct against PM Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 17 मार्च रोजी पलानाडू जिल्ह्यातील बोप्पुडी गावात एनडीएच्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले होते. यावेळी ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
आंध्र प्रदेश निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीची प्रत टीएमसी खासदार साकेत यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता, असेही ते म्हणाले.
Complaint against PM Modi with ECI for violating code of conduct 👇
Filed a complaint with the Election Commission against Modi for using an Indian Air Force helicopter to attend an election rally in AC 96-Chilakaluripet in Palnadu, Andhra Pradesh yesterday
EC rules prohibit… pic.twitter.com/vHp8ooE32Z
— Saket Gokhale (@SaketGokhale) March 18, 2024
तृणमूल काँग्रेसचे खासदार गोखले म्हणाले की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्हे तर निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. कारण निवडणुका सुरू असताना आणि आचारसंहिता लागू असताना न्यायालयांना निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करण्याची परवानगी नसते. त्यामुळे निवडणूक आयोगानेच पीएम मोदींवर कारवाई करावी, असे गोखले म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या 2014 च्या अधिसूचनेचा हवाला देत एका वापरकर्त्याने सांगितले की, SPG सुरक्षा असलेले लोक सरकारी वाहने वापरू शकतात. त्यावर गोखले यांनी उत्तर दिले की हे प्रकरण फक्त बुलेटप्रूफ आणि जॅमर कारसारख्या एस्कॉर्ट वाहनांसाठी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आयएएफ हेलिकॉप्टरचा वापर या अंतर्गत येत नाही.
निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा वापर केल्याने इंदिरा गांधींना अपात्र ठरवले होते –
आचारसंहितेच्या नियमांमध्ये निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा वापरण्यास मनाई आहे. इंदिरा गांधींना 1975 मध्ये विशेषत: याच कारणासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी भाजपने पैसे दिले असतील तर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर का निवडले हे निवडणूक आयोगाने सर्वांना सांगावे, असे खासदार गोखले म्हणाले. आता निवडणूक आयोग यावर का प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे आहे.





