ओझर येथे श्री विघ्नहर गणपती ट्रस्टचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; १८ जोडप्यांचा शुभविवाह

ओझर : श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित यंदाच्या वर्षातील दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १८ जोडपी विवाहबद्ध झाली. हा भव्य सोहळा रविवारी (दि. १८) हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी दिली.
सकाळी गणेशपूजन, सुपारी फोडणे, साखरपुडा आणि टिळा लावण्याचे कार्यक्रम पार पडले. यावेळी भाजपा नेत्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सूर्यकांत रवळे, विनायक मांडे, माजी अध्यक्ष गणेशभाऊ कवडे, मुरलीधर घेगडे, माजी खजिनदार किसन मांडे, कॉन्ट्रॅक्टर दुर्गा शेठ बेल्हेकर, रघुनाथ कवडे, ग्रामस्थ उपस्थित होते. वधू-वरांनी “स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही, करू देणार नाही,” अशी शपथ घेतली.
वऱ्हाडींसाठी रुचकर भोजन, सर्व सुविधा –
सांस्कृतिक भवनच्या भोजन कक्षात ८,००० वऱ्हाडींसाठी रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शुद्ध पिण्याचे पाणी, वधू-वरांसाठी स्वतंत्र जानुसवाडे, वाहनतळ, स्वच्छतागृह यासारख्या सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले. वधू-वरांच्या पक्षाकडून आकारलेल्या रकमेतून हार, पुष्पगुच्छ, बाशिंग, कळसतांब्या, हळद साहित्य, मामांचे फेटे, सुवासिनींचा सत्कार, नवरदेवांचे टोप, टिळा लावणाऱ्यांसाठी टोपी, टॉवेल, अक्षदा आणि कन्यादान विधींसाठी आवश्यक साहित्य पुरवण्यात आले.
दुपारी मिरवणूक आणि विवाह सोहळा –
दुपारी नवरदेवांची मिरवणूक श्री विघ्नहर गणपती मंदिराकडे दर्शनासाठी निघाली. सनईच्या मंगलस्वरात विवाहमंचावर आगमन झाले. यावेळी आमदार शरददादा सोनवणे, ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, माजी अध्यक्ष शाकुजी कवडे आणि ओझरचे माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. दुपारी सव्वाचार वाजता मंगल अष्टकांच्या सुमधुर स्वरात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
सोहळ्याचे सूत्रसंचालन ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक घेगडे यांनी केले. ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या सामुदायिक विवाह सोहळ्याने सामाजिक बांधिलकी आणि परंपरांचे जतन करताना आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांना आधार देण्याचे उद्दिष्ट साध्य केले. स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.





