पेगॅसस प्रकरणी माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव

दिल्ली – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनॉय विश्वम यांनी सोमवारी पेगासस स्पायवेअर प्रकरणी, गेल्या वर्षी संसदेत केलेल्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. न्युयॉर्क टाईम्सने नुकताच या प्रकरणात जो गौप्यस्फोट केला आहे त्या पार्श्वभूमीवर हा हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
भारताने 2017 मध्ये इस्रायलसोबत दोन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण विषयक कराराचा भाग दाखवून हे हेरगिरी करणारे स्पायवेअर खरेदी केले आहे. सरकार बेकायदेशीर देशातील लोकांची हेरगिरी करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर या प्रकरणी देशद्रोहाचाही आरोप केला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव यांनी संसदेत सांगितले होते की, संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर असे आरोप सरकारवर होणे हा योगायोग असू शकत नाही. सरकारने पेगॅसस खरेदी केलेले नाही असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचित केले होते.
हा सगळा भारतीय लोकशाही बदनाम करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण त्यांचे हे निवेदन न्युयॉर्क टाईम्सच्या गौप्यस्फोटानंतर खोटे ठरले असून त्यांनी वस्तुस्थिती लपवण्याचा व संसदेची दिशाभुल करण्याचा प्रकार केला आहे असा आरोप करीत खासदार विश्वम यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की या प्रकरणात सरकारने सत्य लपवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, त्यात त्यांनी देशाचीही दिशाभुल केली आहे.





