राज्यातील फुलपाखरांच्या यादीत ‘कॉमन बॅण्डेड डेमॉन’ची भर

पुणे – राज्यातील फुलपाखरांच्या यादीत आता आणखी एका प्रजातीच्या फुलपाखराची भर पडली आहे. पट्टासूर म्हणजेच “डेमॉन’ प्रजातीतील हे फुलपाखरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळले असून, “कॉमन बॅण्डेड डेमॉन’ असे या फुलपाखराचे नाव आहे. नुकतेच या फुलपाखराच्या अस्तित्त्वाबाबत छायाचित्रीत पुरावा सादर करण्यात आला आहे.
वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) “निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्रातर्फे या फुलपाखराबाबतचे पुरावे नुकतेच सादर करण्यात आले आहे. केंद्रातर्फे फुलपाखरांच्या अभ्यासासाठी आंबोली येथे आयोजित अभ्यास सहलीदरम्यान या फुलपाखराची नोंद घेण्यात आली आहे.
याबाबत केंद्राचे सह-संचालक डॉ. राजू कसंबे म्हणाले, “दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटामध्ये हे फुलपाखरू आढळत असल्याची ब्रिटीशकालीन नोंद असून त्याचा छायाचित्रीत पुरावा अस्तित्त्वात नव्हता. आंबोली येथील शैक्षणिक भ्रमंतीदरम्यान हे फुलपाखरू आढळून आले आहे. संस्थेने “कॉमन बॅण्डेड डेमॉन’चे टिपलेले छायाचित्र हा महाराष्ट्रात हे फुलपाखरू आढळत असल्याचा पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे. आम्ही दिलेल्या छायाचित्रीत पुराव्याने या फुलपाखराच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब झाला आहे.’
फुलपाखरांच्या 278 प्रजातींची नोंद
महाराष्ट्र राज्याच्या जैवविविधता मंडळातर्फे नुकतेच राज्यातील फुलपाखरांच्या सुमारे 278 प्रजातींची नोंद करण्यात आली. या प्रजतींची यादी मराठी नावांसह “महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे’ या पुस्तकात प्रकाशित केली आहे. या यादीत “डेमॉन’ प्रजातीच्या फुलपाखरांचे मराठी नाव “पट्टासुर’ असे ठेवले आहे. राज्यात “डेमॉन’ या प्रजातीमधील “ग्रास डेमॉन’ आणि “रिस्ट्रिक्टेड डेमॉन’ या दोन प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये आता “कॉमन बॅण्डेड डेमॉन’ची भर पडली आहे. हे फुलपाखरू काळपट रंगाचे असून वेगात उडते. हळद आणि आल्याच्या कुळातील झाडे ही त्याची खाद्यवनस्पती आहे.





